संगीत क्षेत्रातील चंद्रमा – लता

दीदी हे जग सोडून गेल्याला आज एक महिना झाला. या साऱ्या दिवसात त्यांच्यावर अनेक लेख छापून आले, अनेक कार्यक्रम झाले, शोकसभा झाल्या. जगभरातील त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या हृदयाचा एक हिस्सा त्या कायमच्या व्यापून राहिल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी माझे एक संगीतप्रेमी मित्र व दुर्मिळ तबकड्यांचे संग्राहक श्री. संजय संत हे माझ्याकडे दीदींचे एक जुने प्रकाशचित्र घेऊन आले. १९६७ साली दीदींच्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेने त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी श्री. नानासाहेब गोरे हे पुण्याचे महापौर होते. त्या कार्यक्रमाला उत्तर देताना दीदींची ही भावमुद्रा टिपली गेली आहे. श्री. नानासाहेब गोरे व मागील बाजूस कविराज ग.दि.माडगुळकरही दिसत आहेत. या कार्यक्रमात ध्वनिव्यवस्था ही त्यावेळचे सुप्रसिद्ध ‘अशोक स्पीकर्स’ चे जुन्नरकर यांची होती. श्री.सुरेश जुन्नरकर यांनी संजयला हे दुर्मिळ छायाचित्र मोठ्या प्रेमाने दिले होते. आधी कुठेही प्रसिद्ध न झालेले हे प्रकाशचित्र ज्या कोणी टिपले आहे हे आज अज्ञात असले तरी त्या प्रकाशचित्रकारास धन्यवाद द्यायलाच हवे. या जुन्या प्रकाशचित्रावर संस्करण करून तो सादर करीत आहोत. खात्री आहे की हे प्रकाशचित्र तुम्हाला नक्कीच त्या काळात घेऊन जाईल.
त्याबरोबरच १९६७ साली लतादीदींची गौरवशाली गायन कारकीर्द पंचवीस वर्षांचा सुरेल टप्पा पूर्ण करीत असल्याचे औचित्य साधून तत्कालीन ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यकार, कवी, गीतकार, संगीतकार, नाट्य-चित्रपटकर्मी यांनी लतादीदींना ‘लता’ या ग्रंथात शब्दरूपी मानवंदना दिली होती. त्यातील हे काही अंश ….निवडक पंचवीस मान्यवरांच्या लेखणीतून लता मंगेशकर !
माई मंगेशकर
माझ्या या थोरल्या मुलीच्या किती गोष्टी सांगाव्यात ? पितृभक्त, मातृभक्त, भावंडांवर प्रेम करणारी अशी ही आमची लता. सर्व जबाबदाऱ्या अंगावर घेऊन हसतमुखाने पार पाडणारी, कुटुंबाचे ऋण फेडणारी. घराण्याचे नाव मोठे करणारी.
मीना खडीकर
१९४२ ते १९६७ सालापर्यंत म्हणजे आज पंचवीस वर्षे ती आमच्यासाठी, घरासाठी सतत कामच करते आहे. लोकांनी स्तुती केली, निंदा केली, पण तिच्यावर कसलाच परिणाम नाही. स्तुतीने ती चढत नाही, निंदेने पडत नाही. माझी दीदी हिमालयासारखी उंच आहे. तिचे मन सागरासारखे विशाल आहे.
आशा भोसले
सगळे म्हणतात, या दोघीजणी दोन डोळ्यांसारख्या आहेत. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. पण त्यांना हे माहीत नाही. की या दोन्ही डोळ्यांना प्रकाशाची जाणीव देणाऱ्या नसा एकच आहेत आणि… जर एका डोळ्यात काही गेले तर दुसऱ्यात पाणी येते!
उषा मंगेशकर
कलावंत म्हणून तर ती मोठी आहेच पण सहकारी म्हणून ती फार मदत करणारी आहे. गाण्याचे मर्म समजावून देईल, अवघड जागा स्वतः गळ्यातून काढून दाखवील, शब्दोच्चार चुकत असल्यास ते दुरुस्त करील असे गाताना ती पावलोपावली मार्गदर्शन करते. तिच्यासोबत गाणे म्हणावयाची संधी मिळणे ही आनंदाची व भाग्याची गोष्ट आहे.
हृदयनाथ मंगेशकर
आमच्या दीदीला असंख्य मित्र-मैत्रिणी आहेत पण तिच्या विशाल हृदयाची कल्पना फारच थोड्यांना आहे. तिच्या विश्वव्यापी कलेचे रहस्य तिच्या इवल्याशा प्रेमळ नि:स्वार्थी हृदयात सामावलेले आहे. अत्यंत पवित्र असा तिचा आत्मा या संसारात अडकलेला आहे.
बालगंधर्व
कुमारी लता आपल्या चित्रपट संगीतातील कारकिर्दीची पंचवीस वर्षे पूर्णकरीत आहे हे ऐकून आश्चर्य आणि आनंद वाटला. या क्षेत्रातील तिची कामगिरी फार मोठी आहे. वडिलांनी नाट्यक्षेत्र गाजवले. मुलगी आज चित्रपटक्षेत्रात आपला जमाना गाजवीत आहे.
वि.स.खांडेकर
हल्ली संध्याकाळी मी फिरायला जातो तेव्हा संध्यारंगाची पश्चिमेकडली कलाकुसर पाहून मन आनंदून जाते. पण फिरून परत येताना ती कलाकुसर दिसत नाही. काळोखाने ती नाहीशी करून टाकलेली असते, मात्र त्या गमावलेल्या आनंदाची भरपाई करणाऱ्या दोन गोष्टी वाटेत मला हटकून भेटतात. रातराणीचा सुगंध आणि लताबाईंच्या कुठल्यातरी गाण्याचे गोड सूर. बंगल्यातून, घरातून, झोपड्यातून नाचत नाचत येणारे सूर!
ग.दि.माडगुळकर
लता चित्रपट व्यवसायात कधीच नव्हती. तिचे साम्राज्य वेगळे आहे. त्या साम्राज्याची ती राणी आहे. पंचवीस वर्षे त्या साम्राज्याशी संबंध आला हे चित्रपटसृष्टीचे भाग्य. लताचे साम्राज्य चिरंतन आहे.
वि.वा.शिरवाडकर
सृष्टीतल्या कोकिळा फक्त वसंतातच गातात, पण या कोकिळेने मात्र प्रत्येक ऋतूला वासंतिक स्वराचा दिलासा दिला आहे. दिवसामागून दिवस आणि वर्षांमागून वर्षे गेली, पण या स्वराची मधुर मिरासदारी कमी झाली नाही.
पु.ल.देशपांडे
अंधारातून प्रकाशरेषा जावी तसा लताचा सूर तीरासारखा घुसतो आणि मनाची काळोखी नष्ट करतो. काही नसले तरी हे सूर ऐकायला तरी जगले पाहिजे असे वाटायला लागते. अतिपरिचयाने देखील अवज्ञा झाली नाही अशी एकच गोष्ट आणि ती म्हणजे लताचे सूर!
गो.नी.दांडेकर
निमित्य काय होते, ते स्मरत नाही, मात्र एकदा देवाची आरती करायचा प्रसंग मजवर आला. ही भावंडे झांजा वाजवू लागली. आरती म्हणत असता सहज मागे वळून पहिले, दीदी डोळे झाकून उभी आहे. तिच्या मुद्रेवर त्या क्षणी जो भाव होता, त्या अनुभवासाठी साधकांना वर्षानुवर्ष श्रमावे लागते. त्या भावसमाधीत दीदी बुडून गेली होती.
प्र.के.अत्रे
सौंदर्य (Beauty), संगीत (Music) आणि सुगंध (Fragrance) ही आमच्या जीवनाची तीन तत्वे आहेत. मनुष्याच्या ह्या तीन भुका भागल्यावाचून त्याच्या आत्म्याचा संपूर्ण विकास होऊ शकत नाही अशी आमची श्रद्धा आहे म्हणून, रोज सकाळी उठल्यानंतर डोळे, कान आणि नाक ह्या तीनही अवयवांना यथास्थित आनंद दिल्यावाचून आमच्या दैनंदिन कार्यक्रमाला आम्ही प्रारंभ करीत नाही.या आमच्या जीवनसाधनेत लताबाईंच्या गायनाला सर्वात मोठे स्थान आहे.
रविशंकर
बुद्धिमान आणि संवेदनशील गायकांविषयी माझ्या अंतःकरणात एक विशेष आदरभाव आहे. आणि या दोन्ही देणग्या ईश्वराने लताबाईंना अगदी मुक्त हस्ताने दिल्या आहेत.
कुमार गंधर्व
लताच्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे नादमय उच्चार. तिच्या गीतामधे दोन शब्दातले अंतर स्वराची आस ठेवून फार सुंदर रीतीने भरून काढलेले असते. जणू ते दोन्ही शब्द निमुळते होऊन एकमेकात मिसळतात. सलग एकजीव होतात. ही गोष्ट फार अवघड आहे. पण लताच्या बाबतीत ती अत्यंत सहज आणि स्वाभाविक होऊन बसली आहे.
नौशाद
लताच्या कलाजीवनाच्या प्रारंभापासून तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे मोठे भाग्य समजतो. कला कीर्ती आणि वैभव यांच्या पायऱ्या क्रमाक्रमाने ती चढून जात असताना तिची प्रगती मी मोठ्या आनंदाने बघत आलो आहे. या अवघड चढणीत कदाचित एखादे वेळी तिची अडखळती पावले मी स्थिर केली असतील पण यापेक्षा अधिक काहीही केलेलं नाही. आज जे श्रेष्ठ कलात्मक व्यक्तिमत्व लताने संपादन केले आहे त्याच्या जडणघडणीला मी हातभार लावला आहे असे म्हणणे हे केवळ अहंकाराचेच नव्हे तर निखालस चुकीचेही होईल.
सलील चौधरी
लताच्या बाबतीत मला नेहमी असे वाटते की गाणे हे तिला श्वासोच्छवासापेक्षाही अधिक सहज आणि स्वाभाविक होऊन बसले आहे. आणि यातच कलाकार म्हणून तिचे मोठेपण सामावले आहे. कोणी म्हणतात, लताचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सुवर्ण स्वर, तर कोणी म्हणतात, लताचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे भावपूर्ण उच्चार पण मला वाटते हे सत्य असले तरी संपूर्ण सत्य नव्हे. कोणतेही गाणे गाताना लता त्याच्याशी आपला आत्मा मिसळून ते गाते. गाण्याशी तिचे होणारे हे सायुज्य हेच तिच्या श्रेष्ठतेचे मुख्य लक्षण होय.
सुधीर फडके
लता मंगेशकर ही केवळ एक व्यक्ती नसून एक दिव्य शक्ति आहे की जिने आपले स्वतःचेच नव्हे तर साऱ्या देशाचे नाव जगाच्या इतिहासात अमर करून ठेवले आहे.
मदन मोहन
माझी ही बहीण लौकिकात किती मोठी आहे याची मला यथार्थ कल्पना आहे. तिच्या सहकार्यावरच आजचे माझे यश आधारित आहे त्याबद्धल मी विलक्षण कृतज्ञ आहे. तरीही तिचा मला जो सर्वात मोठा गुण वाटतो, तो तिच्या मनाचा अस्सल निर्मळपणा आहे. या तिच्या गुणाला कशाचीही तोड नाही, असे मला सतत वाटत आले आहे.
तलत महमूद
चित्रपट क्षेत्रातील या पार्श्वगायिकेने शास्त्रीय संगीताच्या गाढ्या व्यासंगी पंडितानांही अनेकदा विस्मयचकित करून सोडले आहे. लताजींची ग्रहणशक्ती आणि निरीक्षणशक्तीही वाखाणण्याजोगी आहे. तशा गोड गळ्याच्या गायिका अनेक, पण भावपूर्णतेने गाऊन रसपरिपोष करण्याचे सामर्थ्य गळ्यात असणाऱ्या त्यापैकी फारच थोड्या. त्यामुळेच लताजींचे महत्व विशेष आहे.
हेमंतकुमार
लता मंगेशकर हे आता एका व्यक्तीचे नाव राहिलेले नाही. चित्रपटसंगीताच्या इतिहासातील एका कालखंडाचेच ते नाव झाले आहे. सम्राज्ञीप्रमाणे राज्य भोगलेल्या सुरांचे ते नाव आहे. या वैभवाच्या मुळाशी यशासाठी करावी लागणारी कष्टमय साधना आहे. तसेच निर्भर आनंदाचे, सुखासमाधानाचे क्षणही आहेत.
मजरूह सुलतानपुरी
लता मंगेशकरने पार्श्वगायनाला एका स्वतंत्र कलेचा, नवनिर्मितीचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. चित्रपटसृष्टीला तिच्याकडून लाभलेली ही सर्वात मोठी देणगी आहे हे आज सर्वांनीच मान्य केले आहे.
भीमसेन जोशी
त्या जरी शास्त्रीय संगीत प्रत्यक्ष गात नसल्या तरीदेखील त्यांच्या गाण्याला, त्यांच्या ज्ञानाची भक्कम बैठक असल्याचे त्यांच्या ध्वनिमुद्रित संगीतावरून जाणत्यांच्या लक्षात येईल. किंबहुना, भावगीतांना व चित्रपटातील गाण्यांना अनेकदा दिलेल्या चाली या शास्त्रीय संगीताची सुरावट घेऊनच अवतरत असतात. त्यामुळे आज शास्त्रीय संगीत जनसामान्यांत अधिकाधिक लोकप्रिय करण्याचे श्रेय लताबाईंचेच आहे असे म्हटल्यास त्यात कसलीही अतिशयोक्ती होणार नाही.
शिवकुमार शर्मा
लताजींचा मधुर स्वर हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. हा स्वर स्वप्नाळू आहे, ऐंद्रिय संवेदनांना जाग आणणारा आहे, भावनेने पुरेपूर व्यापलेला आहे आणि त्यात, खास बायकी असा एक ढंग, कोवळीक आणि मृदुता आहे.
एस डी बर्मन
लताला असा जादूई स्वर लाभलेला आहे की तो माणसाला एकदम अंतराळात भराऱ्या घ्यायला लावू शकतो आणि त्याबरोबरच शोकग्रस्त मनाचे दुःखही तो हलके करतो.
भालजी पेंढारकर
एकत्र कुटुंब हा लताच्या वैशिष्ट्याचा, अनेकांपैकी एक अभिनंदनीय पैलू आहे. आई, बहिण, भाऊ, आप्त या सर्वांचा एकत्र संसार चालवणे आणि तो प्रेमाने, अभिमानाने आणि मानमान्यतेने निभावणे ही एक गोष्टही, म्हाताऱ्या आई-बापाची देखील अडचण वाटण्याच्या आजच्या काळात, आजच्या जगात लताचे मोठेपण सिद्ध करावयास पुरेशी आहे.