भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन.

नमो नमः ….
जयपूरच्या भव्य अशा एक्झिबिशन सेंटर मध्ये इंडियन फौंड्री असोसिएशनने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनातील डिस्प्लेचे माझे काम मी आटोपले. त्या थंडगार हवेत वाफाळता चहा पिण्यास मी कँटीन मध्ये पोहोचलो. २००३ च्या जानेवारी महिन्यातील ही आठवण असेल. सर्व भारतातून उद्योजक येत असल्याने विविध भाषा कानावर पडत होत्या. माझ्या बाजूलाच काही व्यक्ती गुजराती भाषेत तावातावाने बोलत होत्या. तरीही कानावर पडणाऱ्या शब्दांचा अर्थ मला उमजत होता. त्यांचा विषय होता काही महिन्यांपूर्वी गुजरातेत झालेल्या दंगलीचा. दोन गट पडले होते. कोणीही मागे हटायला तयार नव्हते. पण असे असूनही गुजरातच्या सुरू असलेल्या विकासकामांबाबत मात्र त्या सगळ्यांचे एकमत झाले होते. त्यांचे त्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल चांगले मत होते. त्यांची प्रशंसा करताना त्यांना शब्द कमी पडत होते. असे कोणी एखाद्याबद्दल ते ही राजकारण्याबद्दल चांगले बोलत असेल तर आपोआप कान तिकडे जाणारच ना? त्या दिवशी मी नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आणि नंतर ऐकतच गेलो.
नरेंद्र दामोदरदास मोदी या व्यक्तीला कधी जवळून बघायला मिळेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. २०१३ च्या ऑक्टोबर महिन्यात मला मंगेशकर हॉस्पिटल मधून फोन आला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची नवीन वास्तू उभी राहताना मी पाहत होतोच. त्या वास्तूच्या उद्-घाटनाचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या एक तारखेला ठरला होता. स्टेजवर लावण्यासाठी एक पार्श्वभूमी तयार करायची होती. हॉस्पिटलच्या तीनही इमारतींच्या मॉडेल्सचे फोटो मी नुकतेच काढलेले होते. ती मॉडेल्स व जुन्या इमारतीच्या स्वागतकक्षाजवळ असलेला एक सुंदर पुतळा यांचे मिश्रण करून तो बॅकड्रॉप करण्याचे ठरले. दहा फुट बाय पस्तीस फुट! या कामाबरोबरच डॉ. धनंजय केळकर यांनी माझ्यावर आणखी एक जबाबदारी सोपविली. ती म्हणजे या संपूर्ण सोहळ्याचे प्रकाशचित्रण. माझे दोन सहायक नवीन इमारतीच्या नवीन कक्षांचे तर मी मंगेशकर कुटुंबीय व काही ठराविक प्रमुख अतिथींचे प्रकाशचित्रण करणार होतो. २००१ साली जुन्या इमारतीचे उद्-घाटन त्यावेळेचे पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. या नव्या इमारतीचे उद्-घाटन करणार होते गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी. मंगेशकर कुटुंबीयांबरोबर प्रमुख उपस्थिती असणार होती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची.
एक नोव्हेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास हॉस्पिटलचा परिसर गजबजून गेला. एक-एक निमंत्रित येऊन नव्या इमारतीच्या भव्य अशा रिसेप्शनच्या ठिकाणी जमू लागले. त्यांचे स्वागत करायला हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांबरोबर अवघे मंगेशकर कुटूंब जातीने उपस्थित होते. आपल्या संगीताच्या जादूने अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे मंगेशकर आज आपल्या माई व बाबांच्या आठवणीने रुग्णायितांना वेदना मुक्त करायच्या संकल्पाला सज्ज झाले होते.
साडेचार वाजले. गेटकडून सायरन वाजवत गाड्यांचा ताफा आला. ताफ्यात सर्वात पुढे अनेक अन्टेना असलेली व मोबाईल फोन जॅमरच्या यंत्रणेने सुसज्ज असलेली एक मोठी गाडी होती. सर्व गाड्या एका मागोमाग एक करून थांबल्या. एका पांढऱ्या रंगाच्या स्कोर्पियो गाडीत पुढच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती. सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली. क्रीम कलरचा झब्बा, त्यावर क्रीम कलरचेच हलक्या रेघा असलेले जाकीट, पांढरी सुरवार सोनेरी काड्यांचा रिमलेस चष्मा, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे मंद हास्य आणि हालचालीत कमालीचे चापल्य इतकी सारी वैशिष्ट्ये असलेली ती व्यक्ती होती नरेंद्र मोदी!
गाडीतून उतरताच अत्यंत आदराने वाकत त्यांनी प्रथम भारतरत्न लता मंगेशकर यांना अभिवादन केले. मग शिवशाहीर बाबासाहेबांना आणि समस्त मंगेशकर कुटुंबालाही! रिसेप्शनच्या टेबलपाशी माई मंगेशकर व मास्टर दीनानाथ यांची चित्रे फुलांची सजावट करून ठेवली होती. त्यांच्या समोरच भली मोठी समई. एका बाजूला हॉस्पिटलच्या नावाची कोनशीला मखमली पडद्यात . समईची ज्योत पेटवून व मखमलीचा पडदा बाजूला सारून श्री. नरेंद्र मोदी व लतादीदींनी दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्-घाटन केले. दिवस होता १ नोव्हेंबर २०१३, धनत्रयोदशी, कार्तिक शके १९३५.
सुसज्ज अशा सुपर स्पेशालिटीच्या विविध शाखांचे उद्-घाटन करायला हॉस्पिटलची सारी टीम व श्री. नरेंद्र मोदी हे वरील मजल्यांवर गेले. एका मागोमाग एक विभाग बघून ते सर्व अर्ध्या तासात परत खालीही आले. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा तयारच होता. त्या गाड्यांच्या मागे दीदी, आशाताई वगैरेंच्या गाड्या उभ्या होत्या. पुढील कार्यक्रम काय आहे हे मला माहित होते. डॉ. धनंजय केळकर व श्री. मोदी हे मुख्य दरवाजाकडे जात असतानाच मी पण तेथे पोहोचलो. काचेच्या मोठ्या दरवाज्यातून बाहेर पोर्चमध्ये आल्यावर जुन्या इमारतीकडे हात दाखवून डॉ.केळकर मोदींना म्हणाले – “अब हमें उस बिल्डींग में जाना है…” ते अंतर पाहून लगेचच मोदी उत्तरले – “ अच्छा, तो अब हम पैदल जायेंगे ” असे म्हणून ते दोघेही जुन्या इमारतीकडे चालू लागले. किती सहजता! कार्यक्रमात अचानक झालेला हा बदल अर्थातच ड्रायव्हर लोकांना समजला नाही. त्यामुळे ते तेथून निघेनात. व त्यामुळे मागील गाड्या पुढे जायचा मार्ग अडून बसलेला. बाजूच्या रस्त्याने धावत जात मी दुसऱ्या बाजूची लिफ्ट पकडली व आठव्या मजल्यावर पोहोचलो. त्या मजल्यावर सौध बाहवान कक्षाशेजारी एक मोठा अलिशान हॉल आहे. तेथे श्री. नरेंद्र मोदी यांच्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी चहा-पानाची व्यवस्था व भेटी-ओळखींचा छोटासा कार्यक्रम ठेवला होता. डॉ. केळकर मोदींना घेऊन दुसऱ्या लिफ्टने वर आले. पण मागील गाड्यांत असलेल्या इतर मंगेशकर कुटुंबीयांना यायला दहा मिनिटे जावी लागली.
मी शूज काढून हॉलमध्ये प्रवेश केला. तिथे आधीच खान-पान व्यवस्था बघणारी मंडळी हजर होती. इतक्यात हॉलचे दार उघडले गेले. दारातून श्री. मोदी आत आले. त्यांच्या पायात काळ्या चपला होत्या. त्यांच्या मागून येणाऱ्या डॉ. केळकर यांनी चपला बाहेर काढल्याचे श्री. मोदी यांनी पाहिले मात्र, ते ही लगेच मागे वळले. “आप रहेने दो” असे डॉ. केळकर त्यांना म्हणाले, पण श्री. मोदींनी बाहेर जाऊन चपला काढल्या व आत आल्यावर म्हणाले – “ मुझे माफ किजीये. आप सारे लोगोंने अगर जुते बाहर निकाले है तो मैने भी वही करना चाहिये था ” पुढच्या काही मिनिटात सारे मंगेशकर कुटुंबीय तेथे पोहोचले. भारतरत्न लता दीदी ते मीनताईंची सर्वात लहान असलेली नात सांजिरी अशा सर्वांशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात श्री. नरेंद्र मोदी हास्यविनोदात रमून गेले. त्या अवर्णनीय अशा क्षणांना मी कॅमेरांकित करीत गेलो. सुमारे पाऊण तासाच्या या गप्पानंतर श्री. मोदी जायला निघाले. पण जाताना त्या हॉलमधील प्रत्येकाला भेटून धन्यवाद द्यायला ते विसरले नाहीत. अगदी केटरिंग करणाऱ्या मेधा नायर व तिचा सहायक तरुण गुंजाळलाही त्यांनी धन्यवाद दिले.
त्यानंतर एम ई एस कॉलेजच्या मैदानावर सुमारे पाच हजार निमंत्रितांसाठी कार्यक्रम होता. मंचावर होते श्री. नरेंद्र मोदी, सर्व मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर व श्री. बाबासाहेब पुरंदरे. निवेदनाला होते सुप्रसिद्ध हरिष भिमाणी. या कार्यक्रमातील श्री. नरेंद्र मोदी यांचे भाषण म्हणजे समाज आणि आधुनिक वैद्यकीय सेवा यांचा कसा मिलाफ असावा याचं यथार्थ वर्णन. अर्थातच सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा जन्म कसा झाला हे सांगताना त्यांनी ज्या भावनांचा, शब्दांचा वापर केला ते विसरणे शक्य नाही. मोदी म्हणतात- “ जो परिवार स्वर और सुर को समर्पित हो, सोते-जागते, उठते-बैठते इसीकी आराधना की हो, उसके बावजूद भी, उस करुणा के संस्कार के कारण, जिस धरती पर पिताजीने देह छोडा, और रुग्णसेवा के अभाव के कारण छोडा, दिलपे वो कसक बन के रह जाए, और पिताजी को तर्पण सुर-संगीत के मध्यम से भी कर सकते थे. वो उनके परिवार की बदौलत थी, लेकिन वो नहीं किया. उन्होने पिताजी को ऐसी उत्तम श्रद्धांजली दी, की जिस कारण से वो गये, भावी पिढीमें किसीको ऐसी नौबत न आए, इस करुणा में से इस अस्पताल का जन्म हुआ…”
याच कार्यक्रमात केवळ पाच मिनिटांच्या आपल्या भाषणात दीदी म्हणाल्या होत्या – “ मैं भगवान से प्रार्थना करती हूँ, की हम जो चाहते हैं, आप जो चाहते हैं, की नरेंद्रभाई हमें पी.एम.की जगह पर नजर आए…” आपल्या प्रचंड कार्य-कर्तृत्वाने वाचा-सिद्धी मिळवलेल्या अशा व्यक्तीने उच्चारलेले शब्द फक्त शुभेच्छा रहात नाहीत तर त्याचा आशीर्वाद होऊन जातो. त्याचं प्रत्यंतर पुढे अवघ्या सहा महिन्यातच सर्वांना आलं. श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी २६ मे २०१४ रोजी भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून स्थानापन्न झाले.
त्या दिवशी संध्याकाळी मी तो शपथविधी सोहळा पाहत होतो. प्रथम तत्कालीन राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांनी श्री. नरेंद्र मोदी यांना शपथ दिली. त्यानंतर शेजारील टेबलवर ठेवलेल्या दोन लेजरमध्ये शपथ घेणार्यांनी सह्या करायच्या असतात. मोदी तेथे अत्यंत आत्मविश्वासाने बसले. त्यांनी जाकिटाच्या खिशाला लावलेले मो ब्लां चे पेन काढले व सह्या केल्या. इतर साऱ्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांपैकी एक प्रकाशचंद्र सरंगी सोडले तर कोणीही स्वतःच्या पेनचा वापर केला नाही. पाहिली तर अगदी साधी गोष्ट आहे ही. पण त्यातून त्यांचा स्वभावविशेष कळतो हे नक्की! त्या प्रसंगानंतर मी त्यांचा एक चाहता कधी झालो हे मलाही कळलं नाही.
मध्यंतरी मला एक पोस्ट आली होती. त्याचा लेखक कोण हे माहित नाही. पण त्या लेखकाच्या निरीक्षण शक्तीला मी सलाम केला. मोदींबद्दल तो लेखक लिहितो – “नरेंद्र मोदींचे चाहते असण्याची आणि त्यांची राजकीय शक्ती आणि इच्छाशक्ती व्यतिरिक्त त्यांची बाजू घेण्याची अनेक कारणे आहेत. जसे :
१. सर्वप्रथम, ते कधीही फाटके कपडे, विस्कटलेले केस किंवा गोंधळलेल्या परिस्थितीत दिसणार नाहीत!
२. नरेंद्र मोदींची देहबोली खूपच प्रभावशाली वाटते. त्यांची चाल पुरुषार्थाने भरलेली आहे.
३. भगव्या कपड्यात ते भिक्षूसारखा दिसतात, लष्करी पोशाखात एखाद्या सैनिकासारखे दिसतात, सामान्य रोजच्या कपड्यात ते दैवी राजकुमाराप्रमाणे भासतात.
४. देशभक्ती हा त्यांचा श्वास आहे आणि शिस्त हा त्यांचा रक्तगट आहे.
५. जगातील कोणत्याही महान व्यक्तिमत्वाच्या पाठीशी ते उभे असले तरी त्यांची प्रतिभा मूठभर जास्त असल्याचे दिसते.
६. निवडणुकीपूर्वी एवढी अशक्यप्राय आश्वासने पूर्ण करणारा दुसरा नेता आपण यापूर्वी पाहिला नाही.
७. देशाच्या सर्वोच्च पदावर असूनही ते आपल्या कुटुंबावर अजिबात विशेष उपकार करत नाही. त्यांची भावंडं त्याच्या आजूबाजूला कधीच दिसत नाहीत. अजिबात नाही.
८. ते कधीच सुट्टी घेत नाहीत.
९. ते कधीही आजारी नसतात.
१०. किती बोलायचे आणि कधी गप्प बसायचे हे त्यांना माहीत असते, पण समोरच्याला गप्प कसे ठेवायचे हेही त्यांना माहीत असते.
११. एवढ्या व्यस्ततेतही ते वेदी नाहीत, त्यांची विनोदबुद्धी अप्रतिम आहे.
१२. त्यांचे बोलणे धारदार आणि अतुलनीय आहे. अभिव्यक्तीसाठी भाषेचा प्रवाहही उत्तम आहे. ते एक कवीही आहेत.
१३. ते त्यांच्या विरोधकांच्या फसवणुकीमुळे किंवा आव्हानांना कधीही घाबरत नाहीत.
१४. ते आपल्या विरोधकांच्या किंवा आरोपींच्या मूर्खपणाला उत्तर देण्यात आपला वेळ वाया घालवत नाहीत, तर पूर्ण मुत्सद्देगिरीने आपल्या कर्तव्याशी निष्ठावान राहतात.
१५ फक्त योग्य निर्णयच नाही तर त्यांची सतर्कता आणि समर्पण देखील सर्वात जास्त आवश्यक आहे.
१६. त्यांचे व्यक्तिमत्व हिंदू संस्कृतीचे पवित्र प्रतीक आहे.
१७. त्यांच्या डोळ्यातील चारित्र्याची चमक त्यांना संमोहनतज्ञ बनविण्याइतकी शक्तिशाली आहे.
१८. त्यांना कसलाही मोह नाही, भीती नाही अन स्वार्थही नाही.
१९. आणि शेवटचे म्हणजे वयाच्या ७० व्या वर्षीही ते दिवसाचे १५ ते २० तास काम करतात, तरीही आपण त्यांना कधी जांभई देताना पाहिले नाही!
गेल्या आठ वर्षात भारतवर्षाला प्रगती पथावर नेणारा हा नेता जेंव्हा म्हणतो – “ हमारे देश की एक विशेषता रही है. दुनिया के अन्य देशोंको राजा-महाराजाओंने, सरकारोंने चलाया होगा. यह देश ऐसा है जिसे राजा-महाराजा और शहेनशाहोंने नहीं बनाया. इस देश को बनाया है ऋषीयोंने, मुनियोंने, आचार्योने, भागवतोंने, ग्यानिओंने, विज्ञानियोंने, शिक्षकोंने, सैनिकोंने…” तेव्हा त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे असे वाटते.
पण मग त्याच्याच कवीतेत म्हटल्याप्रमाणे सांगावेसे वाटते –
आसमां में सिर उठाकर
घने बादलोंको चीरकर
रोशनी का संकल्प लें
अभी तो सूरज उगा है ….
विश्वास की लौ जलाकर
विकास का दीपक लेकर
सपनों को साकार करने
अभी तो सूरज उगा है ….
आग को समेटते
प्रकाश को बिखेरता
चलता और चलाता
अभी तो सूरज उगा है ….