सहृदयी कर्तव्यदक्ष

भारतीय गृहखात्याच्या अखत्यारित येणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे CISF!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सुरक्षा कवचामध्ये देशातील सर्वात संवेदनशील पायाभूत सुविधांचा समावेश होतो. सी आय् एस् एफ अणु प्रतिष्ठान, अंतराळ प्रतिष्ठान, विमानतळ, बंदरे, वीज प्रकल्प याशिवाय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल महत्त्वाच्या सरकारी इमारती, प्रतिष्ठित हेरिटेज स्मारके आणि दिल्ली मेट्रोला संरक्षण पुरवते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे विशेष व्हीआयपी सुरक्षा आहे जी महत्त्वाच्या व्यक्तींना चोवीस तास सुरक्षा पुरवते.

माझा अत्यंत जवळचा बालमित्र प्रमोद श्रीपाद फळणीकर हा या आस्थापनेत सध्या डायरेक्टर जनरल या पदावर कार्यरत आहे. एक मराठी माणूस स्वकर्तृत्वाने या पदाला पोहोचतो ही आपल्याला अभिमान वाटावी अशी बाब! तो त्याच्या देदिप्यमान, नैतिकतापूर्ण, निस्पृह व कर्तव्यनिष्ठ अशा कारकीर्दीतून या महिना अखेरीस निवृत्त होत आहे. त्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या त्याच्यावरील पुस्तकात मला लेख लिहायला मिळणे हा आमच्या मैत्रीचा बहुमान आहे. प्रमोदचा आज जन्मदिन! त्याला पुढील निरामय जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

सहृदयी कर्तव्यदक्ष
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार. या दिवशी भारतात ‘मैत्री दिवस’ साजरा केला जातो. ७ ऑगस्ट २०२२ ची सकाळ होती ती. सकाळी सकाळी मोबाईलवर शुभेच्छांचा खच. अपेक्षेप्रमाणे मला माझ्या एका प्रिय मित्राचा मेसेज आला होता. व्हिडीओ क्लिप होती. डाऊन लोड केली आणि लगेचच पाहिली.
त्या क्लिपमध्ये होते फक्त एकाच सिनेमात एकदाच एकत्र काम केलेले दोन लोकप्रिय कलाकार. सोमू व विकी अशी त्यांची सिनेमातील नावे. एक राजेश खन्ना व दुसरा अमिताभ बच्चन. चित्रपटातील गहिरे दोस्त. मूव्ही कॅमेऱ्याने आपल्या गाणाऱ्या दोस्ताला चित्रित करतोय विकी म्हणजे अमिताभ आणि सोमू म्हणजे राजेश खन्ना, गातोय … “ दिये जलते हैं, फूल खिलते हैं बडी मुश्किल से मगर, दुनिया में दोस्त मिलते हैं …”
माझं मन एकदम चाळीस वर्षे मागे गेलं. मॅटिनीला पाहिला होता ‘नमक हराम’ हा सिनेमा. मी आणि प्रमोदनी. राजेश व अमिताभ यांच्यापैकी कोण ग्रेट यावर नंतर हमरीतुमरीने वाद घातलेला आठवला. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. आयुष्यातील धक्क्यांनी बरेच बदल केले. पण आमच्यातील मैत्रीची ती गाज त्या अप्रतिम गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे आजही टिकून राहिली आहे… “दौलत और जवानी, इक दिन खो जाती है सच कहता हूँ, सारी दुनिया दुश्मन हो जाती है… उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते है… दिये जलते हैं… आजपर्यंतची ‘उम्र’ सरताना कायम साथ देणारा माझा मित्र ‘प्रमोद श्रीपाद फळणीकर’ जणू त्या गाण्यातून आपल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवत होता.
नूतन मराठी विद्यालय या शाळेतून १९७७ साली आम्ही शालांत परीक्षा उत्तीर्ण झालो. मग पुढील शिक्षणासाठी ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालय’ जणू नूमवीयांसाठी ठरलेले. त्याप्रमाणे आमचा तेथे ‘शास्त्र’ शाखेत सहज प्रवेश झाला. कॉलेजच्या त्या मोरपंखी दिवसांनी मला ज्या काही अमूल्य अशा गोष्टी दिल्या त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी प्रमोद बरोबर झालेली मैत्री. कॉलेजच्या त्या पाच वर्षात व मग विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण घेताना आम्हाला कधी कळलेही नाही की आम्ही एकत्रपणे ‘आठवणींचे भांडार’ बनवत आहोत. आम्हाला त्यावेळी फक्त असे वाटत होते की आम्ही मजा करत आहोत. मग ती एखादा चित्रपट बघणे असो, त्यावर वाद घालणे असो, एखादी शास्त्रीय संगीताची मैफल असो, एखादा एक दिवसीय किंवा मुक्कामाचा ट्रेक असो, फिरोदिया अथवा पुरुषोत्तम करंडक असो, क्रिकेटची अथवा टेनिसची मॅच पाहणे असो किंवा अगदी ‘आयत्या वेळी अभ्यासाला कमी पडणारा वेळ’ असो! दिवसातला बराचसा वेळ आम्ही एकत्र व्यतीत करत असू.
१९८५ साली मी पदार्थविज्ञान विषयात एम.एस्सी. पदवी घेतली व आधीपासून मनात असलेल्या ‘इंडस्ट्रीयल फोटोग्राफी’ या व्यवसायात रमलो. तर अत्यंत अभ्यासू वृत्तीने प्रमोदने पुढील शिक्षण सुरू ठेवले ते अगदी अलिकडच्या काळात एल् एल् एम् करेपर्यंत. आमच्या शिक्षणाच्या काळात आम्हाला कोणालाही माहित नसलेल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून प्रमोद १९८९ मध्ये आय.पी.एस. सुद्धा झाला. त्याला मध्यप्रदेश केडर मिळाले व त्याची देदीप्यमान कारकीर्द सुरू झाली. ‘न खाउंगा, न खाने दुंगा’ हे गेल्या काही वर्षात खूप प्रसिद्ध झालेले वाक्य त्याने मात्र अगदी सुरुवातीपासूनच आचरणात आणले… आणि तो आमच्या मित्र-मंडळीत कायमच अभिमानाचा विषय ठरला. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ठरला.
वेगवेगळ्या प्रसंगात त्या प्रसंगाला सामोरा जाणारा प्रमोद ‘बघणे’ ही आम्हा मित्रांमध्ये एक अनुभवण्याची संधी बनून राहिली. त्याची सहृदयता, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम, जनसेवा, शौर्य, कलात्मकता, तीव्र विनोदबुद्धी या गुणांचा वेळोवेळी प्रत्यय घेणे व त्यातून मोठ-मोठी होत गेलेली त्याची प्रतिमा मनात साठवणे हा आमचा छंद कधी झाला हे आम्हाला कळलेही नाही.
एक प्रसंग आठवतोय. साल असेल १९९०-९१. सारसबागेजवळील स्पोर्ट्स ग्राउंडवर उस्ताद विलायत खाँ यांचे सतारवादन होते. मी त्यांचे फोटो टिपावे या हेतूने तेथे पोहोचलो. कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. योग्य अशी जागा पकडून मी कॅमेरा गळ्यात अडकवला. काही फोटो लांबून टिपून मी लेन्स बदलून टेली-फोटो लेन्स कॅमेऱ्यावर लावली. आधीची लेन्स बॅगमध्ये ठेवून दिली. कशी कोणजाणे पण माझ्या नकळत कोणीतरी गर्दीचा फायदा घेत अलगदपणे ती लेन्स बॅगमधून चोरली. कार्यक्रम संपताना जेव्हा लेन्स परत बदलायची वेळ आली त्यावेळी माझ्या हे लक्षात आले. धक्का बसला. पण मी साऱ्या इक्विपमेंटचा विमा उतरवला असल्याने आता पुढील कारवाई होणे गरजेचे होते. तेथून तडक मी स्वारगेट पोलिस चौकी गाठली. चौकीत जाण्याचा आयुष्यातील तो पहिलाच प्रसंग. माझं म्हणणं तेथील एका इन्स्पेक्टरने ऐकून घेतले. विमा आहे म्हटल्यावर त्याने जुजबी चौकशी केली. तेथील एका हवालदारास लेन्सचा तपशील व किंमत लिहून घेण्यास फर्मावले. मग तो मला म्हणाला – “ या पंधरा दिवसांनी! आम्ही शोध घेतो.” विमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी व पैसे मिळण्यासाठी ‘शोध घेतला पण वस्तू सापडत नाही’ असा पोलिसांचा दाखला मिळणे मला गरजेचे होते. मग पंधरा दिवसांनी मी परत चौकीत गेलो. मला काय माहित की मला आता बऱ्याच चकरा मारायला लागणार आहेत. दरवेळी गेलं की “ अजून शोध सुरू आहे … नंतर या!” हेच वाक्य ऐकायला मिळू लागले. दीड-एक महिन्यात मी कंटाळून गेलो.
प्रमोदचे त्यावेळी मध्य प्रदेशातील बिलासपुर येथे पोस्टिंग होते. कधीतरी त्याची पुणे भेट घडायची. अचानक चार दिवसांच्या सुट्टीवर प्रमोद पुण्याला आला. सकाळीच आमची भेट झाली. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर मला एकदम लेन्सच्या चोरीची आठवण झाली. मी प्रमोदला म्हणालो- “एका लेन्सच्या कामासाठी पोलिसांनी किती चकरा मारायला लावाव्या मला?” त्याने पूर्ण घटना जाणून घेतली व मला विचारले की एफ.आय.आर. ची कॉपी कुठे आहे. अशी काही एफ.आय.आर. ची कॉपी आपल्याला मिळते हेच मला माहित नव्हते. तो लगेच म्हणाला- “ चल, काढ स्कूटर.” पुढच्याच मिनिटाला आम्ही दोघे स्वारगेट पोलीस चौकीकडे निघालोही होतो. पंधरा मिनिटात आम्ही तेथे पोहोचलो. चौकीच्या दारातच तो स्कूटरवरून उतरला. तो सिव्हिल ड्रेस मध्ये होता. पण आतील इन्स्पेक्टरने त्याच्या चालण्यावरूनच तो कोणी वरिष्ठ अधिकारी आहे हे ओळखले असावे. कारण तो अदबीने उभा राहिला. माझ्या चकरांमुळे मला तर तो ओळखू लागला होताच. आणि आम्ही कशासाठी आलो आहोत हेही त्याने ओळखले होतेच. प्रमोदने स्वतःची ओळख सांगताच त्याने एक कडक सॅल्युट केला. प्रमोदने त्याला पहिलाच प्रश्न केला- “एफ.आय.आर. लेजर कुठे आहे? व यांना तुम्ही तक्रार नोंदवल्यावर एफ.आय.आर.ची कॉपी का दिली नाही?” तो इन्स्पेक्टर अजीजीने बोलू लागला. “ साहेब, एफ.आय.आर. लेजर गुलटेकडी चौकीत असते. मी मागवून घेतो.” प्रमोद त्याला म्हणाला- “ चला … तेथे जाऊ.” यावर त्याचा इलाज नव्हता. प्रमोद चौकीच्या बाहेर पडत असताना तो इन्स्पेक्टर मला दबक्या आवाजात म्हणाला- “ साहेबांना कशाला घेऊन आलात एवढ्याशा कामासाठी?” त्याची या एवढ्याशा कामामुळे एव्हडी गाळण का उडाली आहे याचाच मी विचार करत राहिलो. पण तो आमच्याबरोबर त्याचा एक हवालदार घेऊन गुलटेकडी चौकीत आला. बऱ्याच गठ्ठ्यातून त्याने एफ.आय.आर. लेजर शोधून काढले. त्यात ती तक्रार लिहिली होती. पण लेन्सची किंमत एकदम कमी लिहीली होती. का ? तर त्या गुन्ह्याची तीव्रता एकदम कमी नोंदवली जावी यासाठी. दुसरे म्हणजे तक्रारदाराला एफ.आय.आर.ची कॉपी दिली नाही यामुळेही तो अडचणीत येऊ शकत असल्याने एरवी अरेरावी करणाऱ्या त्या इन्स्पेक्टरच्या आवाजात अजीजी आली असावी. तो परत एकदा प्रमोदला म्हणाला- “ साहेब मी उद्या यांना रिपोर्ट देतो. तुम्ही काळजी करू नका.” प्रमोदच्या नुसत्या तेथे येण्याने माझे दोन महिने अडलेले काम दोन मिनिटात झाले होते. नंतर मी तो रिपोर्ट घेतला. व यथावकाश मला माझ्या चोरीला गेलेल्या लेन्सचे पैसे मिळाले. प्रमोद आता पुण्यापासून बराच दूर असल्याने नेहमीसारखे आमचे ट्रेक होत नव्हते. इतर मित्रही आपापल्या व्यापात व्यस्त झाले होते. पण तो पुण्याला आला आणि आमचा गप्पांचा फड जमला नाही असे होत नसे. एकदा त्याला काही कामासाठी पासपोर्ट फोटो लागत होता. त्याने तसे सांगितले मात्र आम्ही लगेच त्याचा फोटो-सेशन करायचा निर्णय घेतला. एरवीही आम्हा साऱ्या मित्रात दिसायला तो रुबाबदार. आता तर त्याच्या चेहऱ्यावर अधिकाराचे तेज आलेले. पण अधिकाराची ती झूल त्याही वेळी कधी जाणवली नाही आणि आजही. त्या फोटो-सेशनमध्ये फक्त फोटो टिपणे एव्हडेच नव्हते तर ती एक मैत्रीची, हास्य-विनोदांची जमलेली मैफलच होती. आजही त्याची ती प्रकाशचित्रे पाहताना मधली सारी वर्षे विरघळून जातात आणि मन अलगदपणे त्या काळात संचार करू लागतं.
एक तसा अगदी अलीकडच्या काळातील प्रसंग. त्यावेळी प्रमोद आय जी (सी आय एस एफ) या पोस्टवर मुंबईत पोस्टिंग वर होता. माझा मुलगा ध्रुवची फ्रान्स येथील एका संस्थेत शिक्षणासाठी निवड झाली होती. त्याचा पासपोर्ट कालबाह्य झाला होता. त्याचे तातडीने नुतनीकरण करणे गरजेचे होते. तसा अर्ज आम्ही केला. त्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्याचे एक शिफारस पत्र आवश्यक होते. प्रमोदला ते कळवल्यावर त्याने ते त्वरित पाठवून दिले. बाकी सर्व व्यवस्थित पार पडले. पण त्यावेळी ध्रुव लोणी येथील एम.आय.टी. कॉलेजमध्ये शिकत होता व सोमवार ते शुक्रवार तो लोणीलाच हॉस्टेलवर राहत असे. पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशन नावाचा एक सोपस्कार असतो. त्यासाठी एक हवालदार आमच्या कोथरूड येथील इमारतीत आला. त्याने खालीच वॉचमनजवळ चौकशी केली. वॉचमनने हवालदाराला सांगितले की ध्रुव लोणी येथे असतो. झाले. तो हवालदार परत गेला. हे मला कळल्यावर मी कोथरूडच्या शास्त्रीनगर पोलिस चौकीत चौकशी केली. त्यावेळी त्या हवालदाराने मला सांगितले की – “आम्ही चौकशी केली. तुमचा मुलगा लोणी येथे राहतो. आता आम्ही त्या पत्यावर चौकशीसाठी माणूस पाठवू.” मी त्याला परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसावा. परत व्हेरिफिकेशनसाठी माणूस लोणीला गेला आणि त्याच वेळी ध्रुव पुण्याला आला असला तर मग पुन्हा गोंधळच ना? आता हे कोडं कसं सोडवायचं? मग मी प्रत्यक्षच पोलिस चौकीत गेलो. त्या हवालदाराने मला व्हेरिफिकेशनसाठी असलेला अर्जांचा एक गठ्ठाच दाखवला. थोडक्यात त्याला त्यासाठी काही रक्कम द्यावी लागणार हे मला उमगले. हातात वेळ कमी होता. मी त्याला नाईलाजाने काही रक्कम दिली. त्यावर उपकारकर्त्याच्या नजरेने त्याने “ पाहतो मी आता…” असे म्हणून माझी बोळवण केली. असे करूनही काम काही पुढे सरकेना. कदाचित त्याची भूक जास्त असावी. सुदैवाने प्रमोदचा या कामाबद्दल काय झालं हे विचारणारा फोन आला. मी त्याला सर्व कथन केले.
पुढील काही मिनिटात चक्रे हलली. सी आय एस एफ च्या दोन गाड्या वेगाने शास्त्रीनगर पोलिस चौकीच्या आवारात शिरल्या. गौरव तोमर नावाचा एक ऑफिसर चौकीत पोहोचला. त्याने चौकशी केली. त्या हवालदाराकडून ध्रुवची फाईल मागवली. त्यातील राजपत्रित अधिकाऱ्याचे म्हणजे प्रमोदचे शिफारस पत्र त्या हवालदाराला दाखवत विचारले – “ हे शिफारसपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांचा हुद्दा तुला कळतोय का? यांनी शिफारस केल्यावरही व तुम्ही समक्ष चौकशी करूनही हे काम न करण्याचे कारण काय?” चौकीतल्या सगळ्यांसमोरच त्याची खरडपट्टी झाल्याने वरमून त्याने हे काम लगेचच करतो असे आश्वासन दिले.
काहीच वेळात त्या हवालदाराचा मला क्षमेसाठी फोन आला. तो म्हणाला –“ तुमच्या मुलाच्या पासपोर्टचे काम आज होईल. संध्याकाळी त्याला पाठवून द्या.” संध्याकाळी ध्रुव तेथे पोहोचला. त्याला त्याचा पासपोर्ट मिळाला. तो हसऱ्या चेहऱ्याने घरी आला. एका हातात होता नुतनीकरण झालेला पासपोर्ट व दुसऱ्या हातात पैसे. मी आश्चर्याने पैशांबद्दल विचारल्यावर म्हणाला, त्या पोलिसांनी सांगितलं आहे – “ हे पैसे तुझ्या बाबांना दे”. मी त्या हवालदाराला नाईलाजाने दिलेले पैसे परत माझ्याकडे आले होते. अर्थातच या घटनेमागे ‘प्रमोद श्रीपाद फळणीकर’ या निस्पृह अधिकाऱ्याचा करिष्मा होता.
मी जो ‘आठवणींचे भांडार’ हा शब्द वापरला आहे तो प्रमोदच्या आठवणींसाठी यथार्थ आहे. माझी अशी खात्री आहे की त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे असेच भांडार असणार. मग कुणाची बदलीची ऑर्डर असेल, कुणाच्या विमान प्रवासासाठी त्याने पाठवलेली टीम असेल, कोणाला होणारा एखाद्या गुंडाचा त्रास त्या गुंडाला प्रसाद मिळाल्यावर नाहीसा झाला असेल, सांस्कृतिक कार्यक्रमांना त्याने केलेली मदत असेल अशी ही यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच जाईल यात मला शंका नाही. निदा फाजली यांचा एक शेर आहे तो असा – “ उसके दुश्मन बहोत है, आदमी शायद अच्छा होगा.” निदा फाजली जर कधी प्रमोदला भेटले असते तर त्यांनी नक्कीच दुसराही असा शेर नक्की लिहिला असता की – “ उसके दोस्त बहोत है, आदमी याकिनन अच्छाही होगा.”
आमच्या दोस्तीची पंचेचाळीसी पूर्ण होत आहे तर प्रमोदची ‘साठी’! तो आय.पी.एस. होऊन पुण्यापासून एकटा दूर गेला. मग त्याचा वैशालीबरोबर विवाह झाला. दीपांकर व आदित्य यांचा जन्म झाला. त्यांच्या भरभक्कम साथीने प्रमोदची कारकीर्द बहरली. आता तो सर्वोच्च पदावरून निवृत्त होत आहे. महत्वाचे म्हणजे त्याने परत पुण्यातच स्थायिक व्हायचे ठरवले आहे. मध्यप्रदेशी जाताना तो एकटा होता. आता सगळ्यांनाच घेऊन तो पुण्यात असणार आहे. हातात निवांत वेळ असणार आहे. राहून गेलेले तसेच आवडीचे सर्व छंद जोपासता येणार आहेत. त्याच्या मधुर शीळ-वादनाला व सूक्ष्म विनोदबुद्धीला दाद देण्याची संधी परत एकदा आम्हा सर्व मित्रांना मिळणार आहे. परत एकदा आम्ही आमच्यात अजूनही दडलेल्या शैशवास जपत येणारा काळ आनंदाचा करणार आहोत…. कशा काय कोण जाणे पण आमच्या या भावना हिंदी मधील ‘आधुनिक मीरा’ असे बिरूद मिरवणाऱ्या कवयित्री महादेवी वर्मा यांनी आधीच लिहून ठेवल्या आहेत….
मित्र कभी भी आ जाना….
पर, जब आओ तो
दरवाजे पर घंटी मत बजाना…
पुकारना मुझे नाम लेकर
मुझसे समय लेकर भी मत आना…
हाँ ! अपने साथ अपना समय जरूर
लाना… फिर दोनों समय को जोड़ कर
बनाएंगे एक झूला,
अतीत और भविष्य के बीच…
फिर उस झूले पर जब बातें करेंगे
तो शब्द वैसे ही उतरेंगे,
जैसे कागज़ पर कविता
और डूब जायेगें…
परस्पर व्यतीत मधुर क्षणों में…
और जब लौटो तो !
ले जाना थोड़ा मुझे
व मेरा ‘अपनापन’ अपने साथ…..
और छोड़ जाना थोड़ा स्वयं को
और अपना ‘सामीप्य’ मेरे पास….
फिर वापस आने के लिए..